आजवरच्या आयुष्यात कितीतरी लहान-थोर माणसे येऊन गेली. व्यक्तीशः माझ्यावर आणि माझ्या परिवारावर खूप प्रभाव गाजवून गेली. अनेकांनी गडद संस्कारही केले. त्यांपैकी कित्येक माझ्या स्मरणातही नाहीत. मात्र बालपणातले आणि शैशवातले माझे ते घर, माझे म्हणण्यापेक्षा आईवडलांचे घर म्हणणेच अधिक उचित होईल, त्या चंद्रमौळी घरात ये-जा करणाऱ्या व उठबस असणाऱ्या वारकरी पाहुण्यांपैकी बरेच माझ्या स्मरणात आपण होऊनच रुजून बसले आहेत. इतकी वर्षे झाली. अनेक घटना आल्या आणि गेल्या. परंतु ही मंडळी काही जागची हलायला तयार नाहीत. माझ्या या स्मृतिकोषात घराबाहेरचीही मंडळी आहेत. सलग गावेच्या गावे आहेत. दादांच्याबरोबर कधी दिंड्यांतून, कधी महिन्याच्या वारयांतून, कधी श्रावणमासी होणाऱ्या सप्ताहांतून तर कधी पैठणच्या वाळवंटातून मी आलो गेलो. फार नाही परंतु जो काही काळ असा गेला, तो मला अजून जसाच्या तसा का आठवावा? संस्कारांचा भाग म्हणावा तर मी या वारकरी संस्कारांतून निघून सरळ निरीश्वरवादी व नास्तिक बनलो. आणि तरीही मला वारकऱ्यांच्या विश्वाविषयी एक विलक्षण आकर्षण आहे. कुठेही भजनाचे सूर कानावर पडले, की मी लगेच थबकतो व ते क्षण अधाशासारखे टिपून घेतो. वारकरी निरुपणाचेही असेच. मी क्वचितच एखाद्या महाराजाच्या, आचार्याच्या अगर गुरु वगैरेंच्या पाया पडलो. परंतु वारकरीबुवा दिसला की त्याच्या पायावर डोके ठेवण्यात मला काहीच वाटत नाही. उलट समाधान वाटते. असे का व्हावे? तर्कशुद्ध असे मला काहीच सांगता येणार नाही... बुद्धी आणि तर्क यांच्या कसोट्यांवर न टिकणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात असतात, आणि त्या काही केल्या आपला पिच्छा सोडत नाहीत..
(लेखक - अनंत भालेराव। मौज प्रकाशन गृह. पहिली आवृत्ती- 1994)